प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलांनी चांगले शिक्षण घ्यावे असे वाटत असते. बऱ्याचदा त्यांना परदेशी शिक्षणासाठी देखील पाठवायचे असते. पण आर्थिक स्थितीमुळे काही वेळा ते जमत नाही. अशावेळी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा मिळण्यासाठी व त्यांच्या परदेशी शिक्षणाची इच्छा पुरी करण्यासाठी एक आर्थिक मदत म्हणून शैक्षणिक कर्जाचा वापर केला जाऊ शकतो. शैक्षणिक कर्जामध्ये फक्त कर्जाचा आकडा म्हणजेच रक्कम महत्त्वाची नसून त्यामागील संपूर्ण प्रक्रिया देखील तेवढीच महत्त्वाची आहे.
कारण शैक्षणिक कर्जासाठी कोणत्या प्रकारची प्रोसेस असते? कोणती कागदपत्रे लागतात? तसेच याची परतफेड प्रक्रिया काय असते? या सर्व बाबींचा विचार करणे देखील गरजेचे आहे. जर व्यवस्थित सर्व काही पाहून शैक्षणिक कर्ज घेतले असेल तर नक्कीच ती एक चांगली गुंतवणूक ठरेल. तर या लेखामध्ये शैक्षणिक कर्ज कसे घेता येते? यावर अधिक माहिती पाहूया.
| Topic | Quick Summary |
|---|---|
| Educational Loan | उच्च शिक्षणासाठी बँका व वित्तीय संस्थांकडून मिळणारे कर्ज |
| Loan Amount | अभ्यासक्रम, संस्था आणि बँकेनुसार साधारण ₹50,000 ते ₹1.5 कोटी+ पर्यंत |
| Covered Expenses | Tuition Fee, Hostel, Books, Equipment, Exam Fee आणि पात्र परदेशी शिक्षण खर्च |
| Eligibility | भारतीय नागरिक, मान्यताप्राप्त संस्थेत प्रवेश आणि बँकेच्या पात्रता निकषांची पूर्तता |
| Co-Applicant | साधारणपणे पालक/गार्डियन सह-अर्जदार असतो; उत्पन्न व CIBIL तपासले जाऊ शकते |
| Collateral | कर्जाची रक्कम व बँकेच्या नियमानुसार तारणाची आवश्यकता लागू शकते |
| Documents | आधार, PAN, मार्कशीट, Admission Letter, Fee Structure, Income Proof, Bank Statement इ. |
| Moratorium Period | शिक्षणाचा कालावधी + बँकेच्या नियमानुसार अतिरिक्त कालावधी; या काळात EMI सुरू न होण्याची शक्यता |
| Repayment | Moratorium नंतर EMI, Step-up EMI किंवा Prepayment अशा पर्यायांद्वारे परतफेड |
| Government Benefits | पात्र विद्यार्थ्यांना Interest Subsidy, Credit Guarantee किंवा इतर सरकारी योजनांचा लाभ मिळू शकतो |
शैक्षणिक कर्ज
शैक्षणिक कर्ज म्हणजे असे कर्ज जे बँका तसेच इतर वित्तीय संस्थांकडून उच्च शिक्षणासाठी मिळते. वैयक्तिक कर्जा पेक्षा हे कर्ज वेगळे आहे. कारण विद्यार्थ्यांसाठी या कर्जाची रचना केलेली असते. बँक जेव्हा विद्यार्थ्याला कर्जाची मंजुरी देते तेव्हा ते विद्यार्थ्यांची किंवा त्याच्या पालकांची सध्याची आर्थिक स्थिती बघत नाही तर विद्यार्थ्यांनी कोणता अभ्यासक्रम निवडला आहे? कोणती शैक्षणिक संस्था निवडलेली आहे? व अशा….. इतर अनेक गोष्टींना देखील महत्त्व देते. हे कर्ज विद्यार्थ्यांच्या नावावरती घेतले जाते. त्यामुळे विद्यार्थी आर्थिक चिंता न बाळगता शिक्षण पूर्ण करू शकतो. म्हणून हे एक ओझे नसून एक गुंतवणुकच आहे असे म्हटले तरी चालेल.
शैक्षणिक कर्जातून खालील खर्च कव्हर होतात
आपणा सर्वांना वाटते की शैक्षणिक कर्जामध्ये फक्त कॉलेजची फी कव्हर होते. पण त्या व्यतिरिक्त ट्युशन फी, होस्टेलची फी, तसेच मेस चा खर्च असेल शैक्षणिक साहित्य घ्यावयाचे असेल. इतर फी, प्रकल्प खर्च, वगैरे किंवा परदेशातील काही खर्च जसे की, विजा फी, परदेशी आरोग्य विमा आणि विमान तिकीट यांचा देखील कव्हर होतो.
शैक्षणिक कर्जामध्ये 7 प्रमुख प्रकार आहेत. ते खालील प्रमाणे
| अनुक्रमांक | कर्जाचा प्रकार | कोणत्या विद्यार्थ्यांसाठी | कर्जाची मर्यादा |
|---|---|---|---|
| १ | तारण कर्ज | परदेशी शिक्षणासाठी | १.५ कोटींपेक्षा जास्त |
| २ | विना तारण कर्ज | ७.५ लाखांपर्यंतच्या कर्जासाठी | ७.५ लाख |
| ३ | व्होकेशनल लोन | ITI, डिप्लोमा | ₹५०,००० ते ₹१.५ लाख |
| ४ | गव्हर्नमेंट स्कीम लोन | SC/ST/OBC/EWS | ₹४ लाख ते ₹१० लाख |
| ५ | Undergraduate Loan | B.Tech, MBBS, B.Com सारख्या पदवी अभ्यासक्रमांसाठी | ₹१० ते ₹२० लाख |
| ६ | Postgraduate Loan | MBA, M.Tech, MD | ₹२० ते ₹४० लाख |
| ७ | Abroad Studies Loan | परदेशी विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी | ₹५० लाख ते ₹१.५ कोटी |
आता पाहू विनातारण कर्ज व तारण असलेले कर्ज यामधील फरक,
विनातारण कर्ज
म्हणजे असे कर्ज जे फक्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेनुसार व पालकांच्या उत्पन्नाच्या अनुसार मिळते. एखाद्या विद्यार्थ्याला जर आयआयटी किंवा आय आय एम सारख्या संस्थेमध्ये प्रवेश मिळत असेल तर त्यासाठी 40 ते 80 लाख रुपये पर्यंतचे विनातारण कर्ज बँका देतात यामध्ये व्याजदर जास्त असतात.
तारण कर्ज
कर्जाची रक्कम खूप मोठी असेल. जसे की, परदेशात शिक्षणासाठी जावयाचे असेल तेव्हा बँका, घर किंवा एफ.डी किंवा सोन्याचे दागिने किंवा एखादी दुकानाची जागा तारण म्हणून मागतात. परदेशातील शिक्षणासाठी जर शैक्षणिक कर्ज घेत असाल तर हा मार्ग सर्वात सुरक्षित आहे. कारण यामध्ये व्याज दर कमी आणि परतफेडीचा कालावधी जास्त असतो.
शैक्षणिक कर्जाची पात्रता :
शैक्षणिक कर्जाची पात्रता खरंतर दोन विभागांमध्ये विभागली जाते. एक म्हणजे विद्यार्थ्यांची पात्रता आणि दुसरी म्हणजेच सह अर्जदाराची पात्रता. जे की पालक किंवा विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक म्हणजेच गार्डियन, जे सह अर्जदार म्हणून अप्लाय करतात.
विद्यार्थ्यांची आवश्यक पात्रता पाहुयात,
- विद्यार्थी हा भारतीय नागरिक असावा.
- त्याचे वय 18 ते 35 च्या दरम्यान असावे. काही वेळा 45 वर्षापर्यंत देखील वय चालू शकते.
- मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेमध्ये मेरिट किंवा प्रवेश परीक्षेच्या आधारे त्या विद्यार्थ्यास प्रवेश मिळालेला असावा. त्याचे अधिकृत असे पत्र अॅडमिशन लेटर त्याने सादर करावे.
- आधीच्या सर्व परीक्षांमध्ये जसे की दहावी बारावी पदवी या सर्वांमध्ये 50 ते 60% गुण असणे गरजेचे आहेत. जास्त गुण असतील तर व्याज दरात सवलत देखील मिळू शकते.
सह अर्जदार याची पात्रता :
बँका पालकांना किंवा विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक (गार्डियन) यांना सह अर्जदार म्हणून शैक्षणिक कर्जत सामील करतात. कारण विद्यार्थी स्वतः कमवत नसतो. सह अर्जदाराकडे नियमित उत्पन्नाचा स्त्रोत असणे गरजेचे आहे. सह अर्जदाराचा सिबिल स्कोर देखील 700 पेक्षा जास्त असावा व सह अर्जदाराची इतर केवायसीशी संबंधित सर्व कागदपत्रे पूर्ण असणे गरजेचे आहे.
शैक्षणिक कर्जासाठी लागणारी कागदपत्रे:
विद्यार्थ्यांसाठी लागणारे कागदपत्रे:
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- परदेशी शिक्षणासाठी वैध असा पासपोर्ट
- सहा पासपोर्ट साईज फोटो रंगीत
- दहावी बारावी पदवी यांच्या साक्षांकित गुणपत्रिका
- ऍडमिशन लेटर
- फी स्ट्रक्चर
- विद्यार्थ्यांचे मागील सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट
सह अर्जदार किंवा पालकांसाठीची लागणारी कागदपत्रे:
- आधार
- पॅन कार्ड
- मागील तीन महिन्याच्या सॅलरी स्लिप
- फॉर्म 16
- दोन वर्षाचा आयटीआर
- सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट
- विज बिल/ रेशन कार्ड
2026 मधील महत्त्वाच्या बँकांचे व्याजदर
| बँकेचे नाव | व्याजदर (p.a.) | कर्जाची मर्यादा | ठळक मुद्दे |
|---|---|---|---|
| SBI | 8.15% – 10.05% | ₹1.5 कोटी – ₹3 कोटी | SC/ST व महिलांसाठी विशेष सूट |
| BoB | 8.15% – 11.15% | ₹1.25 कोटी – ₹1.5 कोटी | बडोदा स्कॉलर आणि ज्ञान या योजना सुरू आहेत |
| AXIS BANK | 9.70% – 13.70% | ₹75 लाख | परदेशी शिक्षणासाठी कर्ज प्रक्रिया जलद |
| HDFC (CREDILA) | 9.50% – 13.25% | ₹45 लाख – ₹80 लाख | कर्जाची प्रक्रिया तुलनेने जलद |
| ICICI | 9.50% – 12.50% | ₹50 लाख | 5-7 दिवसांत कर्ज प्रक्रिया |
बँकेतून कर्ज कसे घ्यावे त्यासाठीची माहिती आपण पाहिली. पण या कर्जाची परतफेड प्रक्रिया काय आहे? आणि मोरॅटोरियम म्हणजे काय? ते पाहूया.
मोरॅटोरियम पीरियड खूप महत्त्वाचा आहे. ते काय? हे आधी पाहू. बँकेकडून कर्ज मंजूर झाले की लगेच हप्ते म्हणजेच (ईएमआय) सुरू होणार नाही. शैक्षणिक कर्जाचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे हाच तो मोरॅटोरियम पीरियड म्हणजेच हॉलिडे पीरियड किंवा ग्रेस पिरेड असे देखील म्हणू शकतो. जसे की, विद्यार्थ्यांचे शिक्षण कालावधी व त्यानंतरचे (सहा महिने ते एक वर्ष) नोकरी शोधण्यासाठी लागणारा वेळ याला मोरॅटोरियम पिरियड म्हणतात. यादरम्यान बँकेचा हप्ता म्हणजेच प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट भरण्याची तशी सक्ती नसते.
बरेच विद्यार्थी या काळामध्ये एकही पैसा भरत नाही. पण हे चुकीचे आहे. कारण शिक्षण सुरू असताना बँक कर्जाच्या रकमेवर केवळ साधे व्याज आकारत असते. त्यामुळे जर विद्यार्थ्यांनी यादरम्यान हे साधे व्याज व्यवस्थित भरले तर काही बँका शैक्षणिक कर्ज व्याजदर यामध्ये एक टक्क्यापर्यंत सवलत देत असतात. तसेच जर या काळात व्याज भरले नाही. तर ते व्याज मूळ मुद्दलामध्ये जमा होते आणि शिक्षण संपल्यानंतर त्यावर चक्रवाढ व्याज आकारण्यात येते. त्यामुळे कर्जाचा बोजा जास्त वाटू शकतो.
परत फेडीसाठी वेगवेगळे पर्याय:
विद्यार्थ्यांच्या नोकरी आणि पगारानुसार बँका परतफेडीसाठी काही पर्याय देतात. जसे की,
ईएमआय :
स्टेप अप ईएमआय: म्हणजेच सुरुवातीला हप्ता कमी असतो आणि पगार जसा वाढणार तसा हप्ता वाढवत राहणे.
अजून एक पर्याय म्हणजे,
पारशियल प्री पेमेंट: म्हणजेच जेव्हा जमेल तेव्हा हप्त्यापेक्षा जास्त रक्कम भरावी. यामुळे व्याजाची बचत देखील होते.
इतर नियम:
आरबीआयच्या नियमाप्रमाणे शैक्षणिक कर्जाची वेळेच्या आधी परतफेड केली. तर बँक कोणतीही पेनल्टी आकारत नाही. त्यामुळे जमल्यास अतिरिक्त पैसे मिळाले तर ते कर्ज फेडण्यासाठी वापरण्यात यावे. जर तुम्ही कर्जाची हप्ते थकवले तर विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या पालकांचा सिबिल स्कोर खराब होतो. त्यामुळे याची काळजी नक्कीच घ्यावी. काही कारणामुळे हप्ता भरणे शक्य नसले तर बँकेची संपर्क साधावा.
शैक्षणिक कर्ज घेताना सरकारी सबसिडी व व्याज सवलत योजना देखील माहीत असणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या कर्जाचा आर्थिक भार सरकार उचलते.
2026 मधील काही सरकारी योजनांची माहिती खालील प्रमाणे:
सेंट्रल सेक्टर इंटरेस्ट सबसिडी स्कीम: ही केंद्र सरकारची योजना असून यात ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 4.5 लाखापेक्षा कमी असेल.तर या योजनेचे फायदे मिळू शकतात. यामध्ये 10 लाख रुपये पर्यंतच्या कर्जासाठी देखील सवलत मिळते. तांत्रिक कोर्स किंवा व्यावसायिक कोर्स यांसाठी एखादे कर्ज घेतले असेल तर मोरॅटोरियम काळात (शिक्षण आणि एक वर्ष) संपूर्ण व्याज केंद्र सरकार बँकांना देत असते.
पी.एम विद्या लक्ष्मी योजना:
2025 26 मधील ही एक नवीन योजना आहे. त्यामध्ये भारतामधील 860 गुणवत्ता धारक संस्था व त्यात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आणि ज्यांच्या पालकांचे उत्पन्न 8 लाखापर्यंत असेल. अशा विद्यार्थ्यांना 3 टक्के व्याज सवलत मिळते. तसेच 7.5 लाखापर्यंतच्या कर्जासाठी 75 टक्के क्रेडिट गॅरंटी सरकार देते. त्यामुळे बँका विनातारण कर्ज मंजूर करतात.
महाराष्ट्र राज्य व्याज परतावा योजना: महाराष्ट्र सरकारने विविध जाती प्रवर्गांसाठी विशेष महामंडळे स्थापन केलेली आहेत. जसे की,
- (SAARTHI) सारथी: मराठा व कुणबी विद्यार्थ्यांकरीता
- (BARTI) बार्टी: अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकरिता.
- (MAHAJYOTI) महाज्योती ओबीसी विद्यार्थ्यांकरीता.
या योजनेच्या नुसार आपण जे बँकेला व्याज भरणार ते बारा टक्केच्या मर्यादित थेट आपल्या बँक खात्यात रिफंड होते.
डॉ. आंबेडकर केंद्रीय क्षेत्र योजना (परदेश शिक्षणासाठी): जर एखाद्या विद्यार्थ्याला परदेशामध्ये मास्टर्स तसेच पीएचडी करायचे असेल तर ही योजना उत्तम आहे. कारण यात ओबीसी आणि ईबीसी प्रवर्गामधील विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. ज्यांचे उत्पन्न 8 लाखांच्या आत आहे. असे विद्यार्थी यासाठी पात्र आहेत. मोरॅटोरियम कालावधी मधील 100% व्याज सरकार भरते. त्यामुळे ही योजना विद्यार्थ्यांसाठी वरदान आहे.
तर अशा विविध प्रकारच्या योजना तसेच विविध बँकांतर्फे शैक्षणिक कर्ज विद्यार्थ्यांना मिळू शकते. पण तरी त्या त्या बँकेतील महत्त्वाच्या व्यक्तींना भेटून त्या विषयी व्यवस्थित माहिती, पात्रता, व निकष समजून घेणे गरजेचे असते. जेणेकरून कोणत्याही कारणामुळे तुमच्या शैक्षणिक कर्जाचा अर्ज नाकारण्यात येऊ नये.







